अपयशाकडे बघण्याचा दृष्टीकोण

 अपयशाकडे बघण्याचा दृष्टीकोण

नमस्कार!. 

जीवनाला आपण प्रवास म्हणतो. प्रवास म्हणजे त्यामध्ये खाचखळगे चढ-उतार आलेच. ते पार करूनच आपल्याला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचायचे असते. त्यातील खाचखळगे हेच यशापयशाचे प्रतीक आहे. जीवनात देखील पूर्ण यशस्वी माणूस सुद्धा कधी न कधी अपयशी झालेला असतोच. फक्त अपयशाचे गोडवे आपण गात नाहीत. नेहमी पोवाडे यशाचेच गायले जातात. त्यामुळे अपयशाला सर्वजण घाबरतात कारण अपयशाचा सामना कसा करायचा हे आपल्याला शिकवल्या जात नाही. पण आयुष्यामध्ये अपयशाला मागे टाकून पुढे जाणे याची शिकवण अतिशय आवश्यक आहे. 

एडिसनने बल्बचा शोध लावला त्यासाठी त्याच्या यशाचे गीत गायले जाते पण बल्ब चा शोध 99 वेळेला चुकल्यानंतर शंभराव्या वेळेला यशस्वी झाला हे मात्र फार सांगितले जात नाही. बरेचदा प्रसिद्ध आणि यशस्वी माणसांच्या अपयशाचे देखील भांडवल केले जाते किंवा त्यांचे अपयश देखील सोनेरी किनार घेऊन झगमगत येते. पण सामान्य माणसाचे अपयश वारंवार त्याला तू किती नालायक आहेस हे सांगून अधोरेखित केले जाते. आणि तिथूनच त्या मनुष्याचा अधोगतीचा प्रवास सुरु होतो त्यामुळे कुठल्याही अपयशी मनुष्याच्या अपयशामध्ये त्याचा स्वतःचा सिंहाचा वाटा असला तरी त्याच्या सभोवतालची परिस्थिती व व्यक्ती यांचा पण मोलाचा वाटा असतोच.

     यश-अपयश आपण कोणत्या निकषावर ठरवतो? प्रसिद्धी, पैसा, सत्ता साधारणपणे हे तीन निकष आपण त्यासाठी वापरतो. या तीन पैकी एक जरी असेल तर बाकीच्या गोष्टी आपोआप पाठीमागे येतात आणि सामान्य मनुष्याच्या जगात ह्या तीन गोष्टी असलेला मनुष्य यशस्वी गणल्या जातो. काही प्रमाणात हे खरे आणि व्यावहारिक देखील आहे. पण नेहमीच आपण हे निकष योग्य मानू शकत नाही. एखादा मनुष्य बाय चॉईस प्रसिद्धीपासून; सत्तेपासून; पैशापासून दूर राहणे पसंत करू शकतो. पण त्याने तसे केले तर जग लगेच त्याला अपयशी ठरवुन मोकळे होते. कारण जगाच्या नियमात तो स्वतःला बांधून घेत नाही. पण याचा अर्थ तो अपयशी अथवा अयशस्वी आहे असा सरसकट होत नाही. खेळाचे नियम नेहमी विजेता ठरवत असतो आणि सत्ता; पैसा; प्रसिद्धी असलेला मनुष्य विजेता असतो असे जग मानते. त्यामुळे या गोष्टी नसलेला अपयशी असा शिक्का मारला जातो.

सिकंदर आणि राजा पोरस यांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. जिंकलेल्या सिकंदराने, हरलेल्या पोरस राजाला विचारले, "मी तुला कसे वागवावे असे तुला वाटते?" सिकंदराला अपेक्षित उत्तर हेच होते की एका सम्राटाने हरलेल्या राजाला हीन वागणूक द्यावी. पण पोरसाने सांगितले, "मी हरलो असलो तरी राजा आहे. एका राजाने दुसऱ्या राजाला जसे वागवले पाहिजे तसेच तू मला वागवावे."  पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अपयश मिळाले तरी स्वतःला कमी समजू नका.

स्वामी विवेकानंद म्हणतात 99 वेळेला अपयश मिळाले तर 100 व्या वेळेला पुन्हा प्रयत्न करा. मुंगी चे उदाहरण आपल्याला माहिती आहे. सगळ्यांच्या घरामध्ये मुंग्या असतातच. आपण बरेचदा आपला टाईमपास म्हणून त्यांच्या क्रिया पहात असतो. तो एवढासा जीव स्वतःच्या वजनाच्या कितीतरी पट अधिक वजन घेऊन भिंतीवर चढताना अनेकदा पडतो पण पडल्यानंतर पुन्हा चढून चालायला सुरुवात करतो. त्यामुळे एकदा चुकलो की पुन्हा चूकच होईल असे  न समजता प्रयत्न  सुरु ठेवावेत.

इतर देशांमध्ये जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा नुकसान किंवा मृत्यू आपल्यापेक्षा कमी असतात. यावर अनेक जण म्हणतील आपल्या देशात इतकी जनसंख्या आहे त्यामुळे नुकसान आणि मृत्यू जास्त असणारच! पण तसे नाही. इतर देशांमध्ये शाळेपासून disaster management शिकवल्या जाते. आपत्ती आल्यावर काय करायचे याचे प्रशिक्षण मुलं लहान असल्यापासूनच दिले जाते. Home alone नावाचा इंग्रजी सिनेमा सर्वांनाच आठवत असेल. नक्कीच सर्वांनी मुलांना दाखवला असेल आणि खूप एन्जॉय पण केला असेल. त्यातील सिनेमासाठीचा अतिरंजित भाग सोडला तर तो लहान मुलगा सगळ्या अडचणींमधून मार्ग काढून चोरांना देखील पकडून देतो. अर्थात त्याला याचे प्रशिक्षण घरी आणि शाळेत काही प्रमाणात तरी मिळालेले असते. आपल्याकडे घरी तर मुलाला किती वर्ष लहान समजायचे याचा काही सुमारच नाही. त्याला सतत सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळे अचानक एखादी दुर्घटना घडली तर काय करावे हेच त्या मुलांना माहित नसते. शाळेमध्ये देखील आपल्याकडे केवळ मार्क मिळवण्याकडे कल असतो. त्यामुळे आलेल्या परिस्थितीतून, असलेल्या साधनातून मार्ग काढणे हे मुलांना आम्ही शिकवतच नाही आणि त्यामुळे पुढे देखील मनासारखे झाले नाही किंवा थोडेसे अपयश आले तर मुले खचून जातात; डिप्रेशनमध्ये जातात; कधीकधी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्या करणाऱ्या माणसाला लोक भेकड म्हणतात पण त्याच्या आत्महत्येमागे कुठेतरी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान असते. सगळी तब्येत चांगली असताना मृत्यूच्या आपण विचार देखील करत नाही. मग तरुण मुलं आत्महत्या का करतात? कारण यशापयशाच्या निकषावर चालण्याचे दडपण त्यांच्यावर प्रचंड असते आणि अपयशी माणसाची अगदी नालायक माणसाकडून देखील अवहेलना होताना हे बघत असतात त्यामुळे मला अपयशी व्हायचे नाही ह्या तणावाखाली कायम असतात.  इथे हे उदाहरण संयुक्तिक होईल जे कमी-अधिक प्रमाणात सर्वांनी कधीतरी अनुभवले आहे. आपण गाडी चालवताना समोर खड्डा असेल तर सतत मला या खड्ड्यातून गाडी न्यायची नाही असा विचार केला तर गाडी बरोबर त्या खड्ड्यात जाते. कारण आपल्या मनात खड्ड्याचा विचार असतो. तसेच मला अपयशी व्हायचे नाही असा विचारांमध्ये अपयशाचा विचार डोक्यात असतो. त्यामुळे मला काय करायचं नाही यापेक्षा काय करायचे आहे हे सतत डोक्यात ठेवायला हवे. चांगली नोकरी, पैसा, प्रसिद्धी हे मिळाले तरच लोक आपल्याला विचारतील अन्यथा आपल्याला कचऱ्यासारखे दूर केले जाईल असे त्यांना आप्त-इष्ट-मित्र आणि समाज वारंवार सांगत असतो. शब्दांनी सांगत नसेल पण कृतीने खूप काही सांगत असतो आणि कोणाचीही साथ नाही. त्यामुळे सगळीकडे अंधार आहे असे वाटल्यावर मनुष्य आयुष्य संपवण्याचा विचार करतो. अन्यथा मृत्यूचा विचार कोणीही करत नाही.

पालक म्हणून आणि समाज म्हणून आपले पुढील पिढीसाठी अथवा संपर्कात येणाऱ्या प्रत्येकासाठी काय कर्तव्य आहे तर जो जसा आहे त्याला तसेच स्वीकारणे आणि आपण सगळ्यात मोठी चूक इथेच करतो. कारण समाजाने नियम ठरवून दिले आहेत. आणि majority carries the law या न्यायाने त्या नियमांवर जो चालत नाही तो अपयशी असे आपण शिक्कामोर्तब करतो आणि त्याला जाणवून देतो की तो अपयशी आहे. कधीकधी हे त्या टोकाला जाऊन पोहोचते की आपण त्याचा जगण्याचा अधिकार देखील नाकारायला लागतो आणि मग त्याच्या पुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. यासाठी घरी देखील मुलांना हवे ते हजर असे नेहमी नसावे आणि आजकाल मुले लवकर मोठी होत असल्यामुळे त्यांना योग्य वेळेसच बाहेरच्या क्रूर जगाची ओळख आपणच करून द्यावी आणि कुठल्याही कारणाने तुला अपयश आले तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत हा विश्वास त्याच्यात निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे.

चूक देखील योग्यवेळी व योग्य शब्दात सांगणे आवश्यक आहे. चूक झालेल्या मनुष्याला टाकाऊ समजून लेक्चर देणे किंवा स्वतःला खूप येत असल्यासारखे व कधीच न चुकल्यासारखे सांगितले तर तो ऐकत नाही उलट जास्त बिथरतो व चुका करतो त्यामुळे चुका होतातच, आम्हीदेखील चुकलो आहोत, फक्त चुकांमधून सावरणे आणि शिकणे हेच मनुष्याचे लक्षण आहे अन्यथा जनावरे चुका करून जाळ्यात फसतात पण मनुष्य दुसर्‍यांच्या चुका पासून देखील धडा घेऊन पुढे जाऊ शकतो हे नीट सांगता आले पाहिजे. जगात यशस्वी माणसे देखील भरपूर आहेत अयशस्वी देखील आहेत. यश आणि अपयश हे व्यक्तिसापेक्ष आहे. एखाद्याला करियर करण्यात यश वाटत असेल पण एखाद्याला सगळे सोडून पीडितांसाठी काम करणे यात यश वाटत असेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या स्वभावानुसार, आवडीनुसार काम करावे. दुसऱ्याला जोखण्याचा किंवा अपयशी ठरण्याचा प्रयत्न करू नये. सध्या एक गाजत असलेली गोष्ट म्हणजे आलोक कुमार ह्या आयआयटी ग्रॅज्युएट ची गोष्ट! ते स्वतः आयआयटी दिल्लीमधून एमटेक आहेत. अमेरिकेत जाऊन संशोधन करून आयआयटी दिल्लीमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांचे आई-वडील आणि भाऊ देखील दिल्लीतील प्रथित यश महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आहेत. पण त्यांनी अचानक एवढे उत्तम करिअर सोडून आदिवासी भागात जाऊन आदिवासींसाठी काम करणे सुरू केले कित्येक वर्ष त्यांची खरी ओळख कुणालाही नव्हती. त्यांना आऊटसाईडर म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी नेले तेव्हा त्यांनी सांगितले ते कोण आहेत! आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुरामन यांना देखील त्यांनी शिकवले आहे. ते ज्यावेळेस स्वतःचे चमकते करिअर सोडून आदिवासींच्या सेवेसाठी गेले असतील त्यावेळी त्यांना सर्वांनी मुर्खात काढले असेल परंतु त्यांना जे करायचे ते त्यांनी केले. प्रत्येकाने असे करावेच असे नाही पण लाखामधुन एखादा कोणी असा करत असेल तर त्यांना मूर्ख किंवा अपयशी ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मळलेल्या वाटांवरून चालणारा यशस्वी गणल्या जातो आणि नवीन पायवाट तयार करणारा अपयशी ठरवल्या जातो  ही आपल्या समाजाची मोठी शोकांतिका आहे.

यशापयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी तरी अपयशाचा सामना करावा लागतो. त्यासाठी आवश्यक ती मानसिक आणि शारीरिक तयारी करून घेणे ही पालकांची, समाजाची आणि शाळा-महाविद्यालयांची जवाबदारी आहे. त्यानुसार शाळेचा अभ्यासक्रम ठरवला पाहिजे. ज्याप्रमाणे युद्ध नसतानादेखील सैन्य अभ्यास केला जातो, mock drills राबवल्या जातात, आपत्तीजनक परिस्थिती निर्माण करून त्यातून मार्ग काढण्याचे ट्रेनिंग दिले जाते अशा विषयांचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमात अत्यावश्यक आहे. अनेक वेळेला अनेक स्पर्धा होतात त्यामध्ये देखील अशा आपत्ती निवारणाच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. ज्यामुळे मुलांना सहजपणे अपयश पचवण्याची सवय लागेल व आहे त्या परिस्थितीतून, असलेल्या संसाधनातून योग्य मार्ग काढून आपत्ती मधून बाहेर येण्याचे प्रशिक्षण मिळेल. 

अनेक देशांमध्ये चौदा-पंधरा वर्षावरील मुलांना दोन वर्षाचे सैनिकी शिक्षण अनिवार्य आहे. तसेच आपल्याकडे व्हावे यासाठी आग्रह धरणे आवश्यक आहे. त्यासोबतच शेतीविषयक शिक्षण देखील मुलांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये काय करावे याचे निसर्गतः शिक्षण मिळेल.शाळांमध्ये अशा प्रशिक्षणावर पालकांनी विशेष आग्रह धरला पाहिजे. केवळ उन्हाळ्याचे पंधरा दिवस साहस शिबिरांमध्ये जाऊन आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण मिळत नाही. अभ्यास कसा रोज करावा लागतो. तसाच हा देखील अभ्यास नियमितपणे करावा लागतो. त्यामुळे पालकांना स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला हवी. हळूहळू ग्रुप बनवून मुलांना प्रशिक्षित करायला हवे.

खूप अवघड गोष्ट नाही पण सर्वांना यासाठी परिश्रम करावे लागतील.


मानसी दीक्षित

Comments

Popular posts from this blog

प्रज्ञाभारती वर्णेकरवर्यः

जगद्गुरुः आदिशङ्कराचार्यः